ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी ‘नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रां’ची संकल्पना राबवण्याचा निर्णय ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना’अंतर्गत (एनयूएचएम) घेण्यात आला आहे. यात पिंपरी- चिंचवडमध्ये पाच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) उभी राहणार आहेत. पुणे पालिका क्षेत्रात नवीन यूपीएचसी उभी करण्याचा प्रस्ताव नसला तरी पालिका दवाखान्यांच्या नूतनीकरणासाठी ५ कोटी ३० लाखांची रक्कम मंजूर झाली आहे.
एनयूएचएम प्रकल्पाचे राज्याचे व्यवस्थापक डॉ. वैभवराव पाटील यांनी ही माहिती दिली. पुण्यात चालू वर्षी पालिकेच्या एकूण ५३ आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी एनयूएचएमचा निधी मिळणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसह स्थलांतरित लोकसंख्येला याचा विशेष फायदा होऊ शकेल. पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘३६ पालिका दवाखाने आणि १७ पालिका रुग्णालयांसाठी प्रत्येकी १० लाख निधी मंजूर झाला आहे. दवाखान्यांमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तो वापरता येईल.’’
पिंपरी- चिंचवडमध्ये १४ पालिका दवाखान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून ५ नवीन यूपीएचसी उभारण्यात येणार आहेत. या नवीन केंद्रांची जागा पालिकेने स्वत:कडची वापरायची असून केंद्राच्या आकारानुसार जास्तीत जास्त ७५ लाख रुपये बांधकामासाठी मिळणार आहेत. पाटील म्हणाले,‘‘शहरातील झोपडपट्टी भागापासून ‘यूपीएचसी’ केंद्रे अध्र्या किलोमीटरच्या परिसरातच बांधली जावीत अशी योजना आहे. गरजू आणि उपेक्षित नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे हा या केंद्रांचा हेतू असेल. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवण्याबरोबरच या केंद्रांमध्ये दररोज दोन वेळा बाह्य़रुग्ण विभाग चालेल. प्रत्येक केंद्रात एक पूर्णवेळ व एक अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अटेंडंट असा एकूण नऊ जणांचा कर्मचारी वर्ग असेल. बाह्य़रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना औषधे मोफत मिळतील, तसेच रोगनिदान चाचण्या करण्याची सोयही या ठिकाणी असेल. मात्र या ठिकाणी रुग्णांना दाखल करुन घेता येणार नाही.’’
पालिका दवाखान्यांच्या नूतनीकरणासाठी शहरी आरोग्य अभियानात पाच कोटींचा निधी
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी ‘नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रां’ची संकल्पना राबवण्याचा निर्णय ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना’अंतर्गत (एनयूएचएम) घेण्यात आला आहे.
First published on: 20-03-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nuhm uphc hospital pcmc