चिंचवडच्या उद्यमनगर भागात गेल्या वर्षभरापासून मोकाट डुकरांचा सुळसुळाट आहे. या विषयी सातत्याने तक्रारी करून स्थानिक नगरसेवक गणेश लोंढे थकले. मात्र, उदासीन अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. याउलट, डुकरांचा वावर असलेला भाग रेल्वेच्या हद्दीत येतो, असे पोलिसांना शोभणारे उत्तर देऊन हात झटकण्याची तत्परता मात्र अधिकारी दाखवत आहेत.
थेरगाव येथील एका संस्थेस शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम देण्याचा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी होता, त्यावरील चर्चेत चिंचवडचे काँग्रेसचे नगरसेवक गणेश लोंढे यांनी, उद्यमनगर भागातील डुकरांची तीव्र समस्या मांडली. गेल्या वर्षांपासून मोठय़ा संख्येने मोकाट डुकरांचा सुळसुळाट या भागात आहे. त्यांना ताब्यात घ्या, त्यांची विल्हेवाट लावा, अशी मागणी लोंढे वारंवार करत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी हा विषय मांडला, मंगळवारी त्यांनी स्थायी समितीत दाद मागितली. तेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी, डुकरांचा वावर रेल्वेच्या हद्दीत आहे, त्यामुळे तेथे आपण कारवाई करू शकत नाही. आपण रेल्वे प्रशासनाला कळवू, तेच कारवाई करतील, असे अजब उत्तर दिले, असे लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या भागात १०० डुकरे आहेत, असे पाचसहा जण आहेत, ते डुकरांचा तसेच डुकरांच्या मटणाचा खुलेआम व्यवसाय करतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, याचे लोंढे यांनी आश्चर्य व्यक्त केले. दुसरा मुद्दा, डुकरांना दिवसा पकडण्यात अडचणी येत असल्याचे कारण देत कारवाईला टाळाटाळ केली जाते, असे सांगत मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम रात्रीच्या वेळी करावी, असा पर्याय लोंढे यांनी सुचवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा