पुणे : परदेशातील करोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असली तरी राज्यातील करोनाची सद्य:स्थिती मात्र सकारात्मक आहे. राज्यात नव्याने आढळणारे करोनाचे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांचे प्रमाण व्यस्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही १५० च्या जवळपास आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ९८ टक्के एवढे आहे. त्यामुळे घाबरुन जावे असे राज्यातील चित्र नाही, असा निर्वाळा राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचा साथरोग सर्वेक्षण विभाग महासाथीच्या सुरुवातीपासून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येच्या नोंदी ठेवत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेदरम्यान बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आणि नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असे चित्र वारंवार दिसून आले. त्याचवेळी रुग्णांना असलेली लक्षणे तीव्र किंवा गंभीर असणे, उपचारांसाठी रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल होण्याची गरज या गोष्टींचे प्रमाणही वाढल्याचे स्पष्ट दिसून येत होते आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही चिंताजनक होते. २०२२ च्या सुरुवातीला ओमायक्रॉन विषाणू संसर्गामुळे रुग्णवाढीची नोंद झाली तरी मोठय़ा प्रमाणात झालेले लसीकरण किंवा लोकसंख्येतील बहुतांश नागरिकांना होऊन गेलेला संसर्ग यातून तयार झालेल्या करोना प्रतिपिंडांमुळे ओमायक्रॉन संसर्गाचे स्वरूप मात्र सौम्यच राहिलेले दिसून आले. त्यामुळे साहजिकच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज अत्यल्प प्रमाणात रुग्णांना भासली.

हेही वाचा – देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सोमवारी दिलेल्या अहवालानुसार राज्यात १५४ सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांवर घरगुती उपचार करण्यात येत आहेत. राज्यात करोनाचा संसर्ग झालेले ९८.१७ टक्के रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. मुंबई, पुणे अशा शहरांबाहेर रुग्णसंख्या अत्यल्प आहे, असेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. करोना लसीकरणाची राज्यासह देशातील व्याप्ती समाधानकारक असल्यामुळे ओमायक्रॉनच्या लाटेतही संसर्गाचे स्वरूप सौम्यच राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे बीएफ.७ या उपप्रकाराला घाबरुन जाणे योग्य नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number active corona patients in the state is less 98 percent patients are stuttering ysh