लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जगातील मधुमेहाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, सध्या दहापैकी एक व्यक्ती मधुमेहग्रस्त आहे. पुढील ३० वर्षांत प्रत्येक देशात मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जगात २०५० पर्यंत मधुमेहाचे १.३ अब्ज रुग्ण असतील, असा अंदाज लॅन्सेट संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात मांडण्यात आला आहे.
मधुमेहाच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हे जगातील प्रत्येक आरोग्य व्यवस्थेसाठी खूप मोठे आव्हान आहे. या विकारामुळे हृदरोग आणि हृदयविकाराचे झटके येण्याचा धोका निर्माण होत आहे. जागतिक पातळीवर वृद्धांच्या संख्येत होणारी वाढ आणि स्थुलता ही दोन प्रमुख कारणे मधुमेहींची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे संशोधनात म्हटले आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीन’मधील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’मधील संशोधकांनी हा अंदाज मांडला आहे.
आणखी वाचा-खबरदार! अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास पालकांना तुरुंगाची हवा
जागतिक पातळीवर एकूण मधुमेहींमध्ये ९६ टक्के टाईप २ प्रकारच्या मधुमेहाचे आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज २०२१’ या अभ्यासाचा आधार संशोधकांनी घेतला आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या सहव्याधी, मधुमेहामुळे होणारे मृत्यू यांचा २०४ देशांमधील वेगवेगळ्या वय आणि लिंगाच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला होता. याच अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी आता २०५० पर्यंतचा मधुमेहाबाबतचा अंदाज वर्तविला आहे.
जागतिक पातळीवर मृत्यू आणि अपंगत्व येण्यासाठी कारण ठरणाऱ्या प्रमुख दहा घटकांमध्ये मधुमेहाचा समावेश आहे. मधुमेहाचे प्रमाण प्रामुख्याने ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठांमध्ये आढळून येत आहे. जगभरात ज्येष्ठांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सरासरी २० टक्के आहे. त्यात उत्तर आफ्रिका आणि आखाती देशांत हे प्रमाण तब्बल ३९.४ टक्के आहे. मध्य युरोप, पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये हे प्रमाण १९.८ टक्के आहे. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या माहितीनुसार, जगात मधुमेहाचे २०२१ मध्ये ५२.९ कोटी रुग्ण होते आणि त्याच वर्षी मधुमेहामुळे ६७ लाख जणांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-पुणे: ‘व्हाईट गुड्स’च्या वाहतुकीतून रेल्वेला मिळणार कोट्यवधी
मधुमेह टाईप २ हा प्रकार स्थूलता, व्यायाम नसणे आणि चुकीचा आहार याच्याशी निगडित असतो. मात्र मधुमेहाचा प्रतिबंध आणि नियंत्रण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या मागे अनुवांशिक, सामाजिक आणि आर्थिक कारणेही आहेत, असे संशोधक लॉरेन स्टॅफॉर्ड यांनी नमूद केले.
मधुमेह वाढण्याची कारणे
-जास्त वजन
-अयोग्य आहार
-तंबाखू सेवन
-शारीरिक हालचाल कमी
-मद्यप्राशन