पुणे : आजाराची लक्षणे आणि परिणामांपूर्वीच ज्या आजाराचे नावच रुग्णांना धडकी भरवते तो आजार म्हणजे कर्करोग. मागील काही वर्षांमध्ये कर्करोगावर औषधे आली, प्रतिबंधात्मक चाचण्याही विकसित झाल्या, मात्र आजही कर्करोगाचे निदान करणे हे आव्हानात्मक आहे. बहुतांश प्रकारच्या कर्करोगांचे निदान हे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होत असल्याने ते आजही जीवघेणे कर्करोग ठरतात. रक्ताचे कर्करोग, पोटातील विविध प्रकारचे कर्करोग, स्वादुपिंडाचा, त्वचेचा कर्करोग हे यांपैकी काही प्रमुख कर्करोग आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील सर्वच देशांसमोर कर्करोग या आजाराचे आव्हान आहे. भारतही त्याला अपवाद नाही. भारतातील नऊपैकी एका व्यक्तीला त्याच्या हयातीत कर्करोग होण्याची शक्यता जागतिक अहवालांवरून वर्तवली जाते. महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा स्तनांचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग, मुलांमध्ये ल्युकेमिया अशा कर्करोगांचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२५ पर्यंत २०२० च्या तुलनेत भारतातील कर्करुग्णांचे प्रमाण १२.८ टक्के एवढे वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कर्करोगाचे अक्षरश: शेकडो प्रकार दिसून येतात. प्रामुख्याने महिलांमध्ये आढळणारा स्तनांचा कर्करोग हा लवकर निदान झाले तर बरा होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लसही आता उपलब्ध आहे. मात्र बहुतांश कर्करोग हे केवळ उशिरा निदान या एका कारणास्तव बरे होण्यापलीकडे जातात. त्यांमध्ये प्रामुख्याने पोटाच्या कर्करोगाचे विविध प्रकार, स्वादुपिंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा तसेच आतड्यांचा कर्करोग, त्वचेचे आणि रक्ताचे कर्करोग यांचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा – पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा

कर्करोग शल्यविशारद डॉ. राहुल वाघ म्हणाले, बहुतांश कर्करोगांची प्राथमिक टप्प्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आजार वाढत जातो तशी लक्षणे बळावतात. या आजाराबाबत जागरुकतेचा अभाव आहे आणि ज्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी चाचण्या किंवा तपासण्या आहेत, त्या करण्याबाबत उदासीनताही आहे.

हेही वाचा – पुण्यासह राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस थंडीचे

या लक्षणांकडे लक्ष हवे

  • अनपेक्षितपणे कमी होणारे वजन, कोणताही अनपेक्षित रक्तस्राव, त्वचेवरील चट्टा किंवा ॲलर्जी.
  • महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे वय नसतानाही अनियमित झालेली मासिक पाळी.
  • दीर्घकाळ राहणारा थकवा, अशक्तपणा आणि बरी न होणारी विषाणूजन्य आजाराची लक्षणे.

    चाचण्या आणि तपासण्या

डॉ. विजू राजन म्हणाल्या, कर्करोगाचे निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी आता काही चाचण्या आणि तपासण्या उपलब्ध आहेत. कोलोनोस्कोपी, मॅमोग्राम, पॅप स्मिअर चाचणी, ओरल कॅव्हिटी तपासणी आणि विविध प्रकारच्या एंडोस्कोपी यांमुळे कर्करोगाची शक्यता पडताळून पाहता येते. कुटुंबात कर्करोगाची पार्श्वभूमी असल्यास या चाचण्या लवकर निदान करण्यास किंवा आजाराची शक्यता ओळखण्यास मदत करतात. त्यामुळे डॉक्टरांनी सुचवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता चाचण्या करण्यास प्राधान्य द्यावे, असेही डॉ. राजन यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of life threatening cancers is still high late diagnosis is serious says experts pune print news bbb19 ssb