राजकीय निष्ठा बदलणाऱ्यांसाठी राजकारणात ‘आयाराम-गयाराम’ हा शब्दप्रयोग केला जातो. हरियाणामधील पतौडी विधानसभा क्षेत्रामधील गयालाल या आमदाराने एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला आणि पक्षांतर करणाऱ्यांसाठी ‘आयाराम गयाराम’ ही राजकारणातील ‘उपाधी’ सर्वदूर प्रचलित झाली. एके काळी पक्षनिष्ठेशी प्रतारणा म्हणून वापरल्या जाणाऱ्या या शब्दाला आता प्रतिष्ठेचे वलय निर्माण झाले आहे. पुण्यातही सध्या ‘आयाराम गयारामां’ची संख्या वाढत चालली असल्याने पक्षांतराचे वारे वाहत आहे.
आगामी महापालिका निवडणूक आणि राज्यातील बदललेली राजकीय गणिते लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठा बदलण्याचा सपाटा लावला आहे. विशेषत: भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने पुण्याकडे लक्ष केंद्रित केल्याने पक्षांतराचे वारे घोंघावू लागले आहे. सध्या त्याचा केंद्रबिंदू कसबा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर पक्षप्रवेशाची नांदी केली. माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर आणि प्राची अल्हाट हे भाजपवासी झाले. त्यांपैकी धनवडे आणि जावळे हे कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपने कसब्यावरील पकड आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाने कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षात घेऊन भाजपवर कुरघोडी केली आहे. त्यावरून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मात्र, मित्रपक्षातच त्यांनी केलेल्या प्रवेशामुळे भाजपच्या नेत्यांची अडचण झाली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या बदलाचे वारे सध्या तरी कसब्यापुरते मर्यादित दिसत असले, तरी अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्याही सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तीनपैकी एका पक्षाला प्राधान्य देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
धंगेकर यांच्यामुळे पुण्यात काँग्रेस चर्चेत असायची. आता पुन्हा काँग्रेसमध्ये मरगळ येण्याची शक्यता आहे. त्यातच धंगेकर यांच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील आणि एनएसयूआय सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील १०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. सध्या पुण्यातील काँग्रेस जुन्या पदाधिकाऱ्यांच्याच ताब्यात आहे. नवीन फळी तयार होत नसल्याने काँग्रेसची वाढ खुंटल्यासारखी स्थिती आहे. आता युवक काँग्रेस आणि एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत संघटनांचे तरुण पदाधिकारीही पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेसची अवस्था आणखी खालावल्याचे दिसू लागले आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षालाही गळती लागली आहे. या पक्षातील आणखी काही पदाधिकारी हे शिवसेना (शिंदे) पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. काही माजी नगरसेवक भाजपच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुण्यात सध्या पक्षांतराचे वारे जोमाने वाहू लागले आहेत.
राजकारणातील पक्षनिष्ठा कायम चर्चेत असते. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि पदनिष्ठेपुढे मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रकार राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या पक्षांतराला १९७६ पासून सुरुवात झालेली दिसते. त्या वर्षी १६ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. १६ पैकी १५ राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. तेव्हापासून देशात आघाड्यांचे राजकारण सुरू झाले. सत्ता काबीज करण्यासाठी विचारधारा आणि राजकीय वैर बाजूला ठेवण्यात येऊ लागले. त्यामुळे भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविण्याचे प्रकार वाढले.
१९६७ ते १९७१ या कालावधीत देशात १४२ खासदारांनी आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये १९०० आमदारांनी पक्षांतर केले. त्यामुळे काही राज्यांतील सरकारे कोसळली. हे प्रकार रोखण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीच्या शिफारशीप्रमाणे १९८५ मध्ये ५२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. घटनेत १० व्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला. कलम १०२ आणि १९१ मध्ये आमदार-खासदारांना अपात्र ठरविणाऱ्या अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. या सर्व तरतुदींना ‘अँटीडिफेक्शन’ किंवा ‘पक्षांतरबंदी कायदा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि पदनिष्ठेपुढे मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याचे पडसाद राज्यात सर्वत्र दिसू लागले आहेत.
महापालिका निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्चित झाले नसले, तरी निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीला राजकीय पक्षांनीही सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पक्षांतराने जोर धरला आहे. आगामी काळाची चाहूल पाहून पावन होण्यासाठी हे ‘आयाराम गयाराम’ पावले टाकू लागले आहेत.
sujit.tambade@expressindia.com