पुणे : वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या आता वाढली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांतून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. गेल्या वर्षभरात एक क्रमांक सर्वाधिक महागडा ठरला असून, त्यासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महागडी मोटार खरेदी केल्यानंतर तिला क्रमांकही आवडीचा हवा, अशी अनेकांची हौस असते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. यामुळे आरटीओकडून आर्थिक वर्ष २००४-२००५ पासून आकर्षक क्रमांकांचा लिलाव करण्यास सुरुवात झाली. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळणारा महसूल वर्षानुवर्षे वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आरटीओला आकर्षक क्रमांकातून ४९ कोटी ८२ लाख ८४ हजार ७३८ रुपयांचा महसूल मिळाला. त्याआधीच्या वर्षात हा महसूल ३८ कोटी १९ लाख ६५ हजार ४९५ रुपये होता. त्यात आता २५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक पैसे एक क्रमांकातून मिळाले आहेत. एक क्रमांकासाठी मोटारींच्या क्रमांक मालिकेत ४ लाख रुपयांचे शुल्क आहे. तोच क्रमांक इतर वाहनांच्या मालिकेतून घेतल्यास तिप्पट म्हणजेच १२ लाख रुपयांचे शुल्क भरावे लागते. एक क्रमांकासाठी सर्वाधिक शुल्क असून, इतर क्रमांकासाठी वेगवेगळे शुल्क आहे. पुणेकरांची सर्वाधिक पसंती असलेल्या क्रमांकामध्ये १, ९, ९०९, ९९९, ९९९०, ९९९९, ७, ७७७, ७००७, ७७७७, १२, १२१२, ४१४१, २१२१, ७२७२, ५५५, ५५५५, ४४४४, ९६, १००, ५००, ५०५, १००१, ११११, ३००३, ५०५०, ५१५१ यांचा समावेश आहे.
सर्वाधिक पैसे मिळवून देणारे क्रमांक
क्रमांक | शुल्क | लिलाव रक्कम | एकूण (रुपयांत) |
१ | १२ लाख | ० | १२ लाख |
१ | ४ लाख | ३ लाख १२ हजार | ७ लाख १२ हजार |
५ | २ लाख १० हजार | ४ लाख ५० हजार | ६ लाख ६० हजार |
७ | ७० हजार | ३ लाख ५० हजार | ४ लाख २० हजार |
७ | ७० हजार | २ लाख ५५ हजार | ३ लाख ५७ हजार २७ |
९ | १ लाख ५० हजार | २ लाख ७ हजार २७ | ३ लाख ५७ हजार २७ |
१२१२ | ४५ हजार | १ लाख १ हजार २१२ | १ लाख ४६ हजार २१२ |
९९९९ | ४ लाख ५० हजार | १ लाख ५० हजार | ६ लाख |
वाहनचालकांकडून आकर्षक क्रमांकांना मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने १, ९ आणि १२१२ क्रमांकाना पसंती दिसून येत आहे. आकर्षक क्रमांकातून सरकारला मिळणाऱ्या महसुलातही वाढ झालेली आहे. -संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी