पुणे: देशातील अतिश्रीमंतांच्या संख्येत आगामी काळात वाढ होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी (२०२२ मध्ये) देशात १२ हजार ६९ अतिश्रीमंत होते. त्यांची संख्या २०२७ मध्ये १९ हजार ११९ वर पोहोचण्याची शक्यता आहे. अतिश्रीमंतांच्या संख्येत पाच वर्षांत ५८.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. याचवेळी देशातील अब्जाधीशांची संख्या पाच वर्षांत १६१ वरून १९५ वर जाण्याचाही अंदाज आहे.
‘नाइट फ्रँक इंडिया’ने संपत्ती अहवाल २०२३ प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, देशातील श्रीमंतांची संख्या २०२२ मध्ये ७ लाख ९७ हजार ७१४ आहे. पुढील पाच वर्षांत त्यांची संख्या १६.५ लाखांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दहा लाख डॉलर अथवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची श्रीमंतांमध्ये गणना होते. याचवेळी ३ कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांची गणना अतिश्रीमंतांमध्ये होते.
आणखी वाचा-सहकारी बँकांची कोंडी अखेर सुटली; तक्रारी सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा वरिष्ठ अधिकारी
देशातील अतिश्रीमंतांच्या संख्येत मागील वर्षी ७.५ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. त्याआधीच्या वर्षात २०२१ मध्ये देशातील अतिश्रीमंतांमध्ये ७.५ टक्के वाढ झाली होती. वाढते व्याजदर आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया यामुळे अतिश्रीमंतांच्या संपत्तीला फटका बसला आहे. मात्र, श्रीमंतांच्या संख्येत मागील वर्षी ४.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. याचबरोबर देशातील अब्जाधीशांची संख्या मागील वर्षी ११ टक्क्याने वाढली आहे.
जागतिक पातळीवर अतिश्रीमंतांमध्ये घट
जागतिक पातळीवर २०२२ मध्ये अतिश्रीमंतांमध्ये ३.८ टक्के घट झालेली आहे. त्याआधीच्या वर्षात २०२१ मध्ये जगभरात अतिश्रीमंतांमध्ये तब्बल ९.३ टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर मंदीचे सावट, मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढ आणि भूराजकीय अस्थिरता हे घटक अतिश्रीमंतांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरले आहेत.
भारताची प्रमुख उद्योगांमध्ये जोरदार कामगिरी सुरू असल्याने आर्थिक विकासाला गती मिळत आहे. जागतिक पातळीवर भारत हा नवउद्यमींचे (स्टार्टअप) केंद्र बनला आहे. यामुळे देशातील श्रीमंतांमध्ये आगामी काळात वाढ होत जाणार आहे. -शिशिर बैजल, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया