दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते. आता केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय आणि बॉम्बे नॅशनल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) यांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, चिमण्याच दिसत नसल्याच्या ठिकाणांमध्ये गेल्या सात वर्षांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
वन मंत्रालय आणि बीएनएचएस यांच्या वतीने २०१२ मध्ये ‘सिटिझन स्पॅरो’ हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत नागरिकांच्या सहकार्याने देशभरातील चिमण्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस आणि नेचर कन्झव्र्हेशन फाऊंडेशन यांनीही सहकार्य केले होते. या उपक्रमामध्ये नागरिकांनी त्यांची चिमण्यांबाबतचे विविध निरीक्षण प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदवले. त्यासाठी ८ भाषांमध्ये प्रश्नावली तयार करण्यात आली होती. या उपक्रमामध्ये देशातील ५ हजार ६५५ नागरिक सहभागी झाले असून ८ हजार ४२५ ठिकाणांहून निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. चिमण्यांबाबतच्या एकूण १० हजार ६६६ निरीक्षणांची नोंद करण्यात आली आहे. ७ ते ९१ अशा विविध वयोगटातील नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.
ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये चिमण्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येत आहे. २००५ च्या तुलनेत चिमण्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून चिमण्या दिसतच नसल्याचे निरीक्षण नोंदवणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. ज्या ठिकाणी अजूनही चिमण्या दिसतात, तेथेही त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. घरटय़ांची संख्याही खूप कमी झाली असून त्यामुळेच चिमण्यांची संख्या कमी होत आहे.  मुंबईमध्ये अधिक चिमण्या दिसतात तर मुंबई खालोखाल कोईम्बतूर आणि पुणे या शहरांमध्ये तुलनेने अधिक चिमण्या दिसतात, असे निरीक्षण नागरिकांनी नोंदवले आहे. चिमण्या दिसतच नसल्याची तक्रार बंगळुरू आणि चेन्नईतील नागरिकांनी अधिक प्रमाणात नोंदवली आहे. देशाच्या पश्चिम वायव्य भागात, ईशान्य भागात तुलनेने अधिक चिमण्या दिसतात. गुजरातमध्ये चिमण्यांचे मोठे थवे दिसतात. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश या देशाच्या मध्य भागातही चिमण्या अधिक दिसतात. मात्र, उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात चिमण्यांची संख्या अधिक घटली असल्याचे नागरिकांनी मांडलेल्या निरीक्षणांवरून दिसून येते.