पुणे : समाजमाध्यमात झालेली ओळख एका परिचारिकेला महागात पडली. तिची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन परिचारिकेला खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्या पतीपासून विभक्त झाल्या आहेत. सायबर चोरट्याने परिचारिकेला समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती.
चोरट्याने त्याचे नाव अमनप्रीत सिंग असे सांगितले होते. लंडमधील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती. लंडनमधून लवकरच भारतात परतणार असून, सायबर चोरट्याने परिचारिकेला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. परदेशातून महागडी भेट पाठविणार असल्याचे त्याने सांगितले. परदेशातून पाठविलेले भेटवस्तुंचे खोके घेण्यासाठी २७ हजार रुपये लागतील, असे त्याने सांगितले. परिचारिकेकडून त्याने पैसे उकळले.
हेही वाचा : पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’; टोळीयुद्ध नेमकं कधी सुरू झालं? शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांसमोर काय आव्हान?
सिंगने तिची ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने परिचारिकेकडे खंडणी मागितली. घाबरलेल्या परिचारिकेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.