दोन आठवडय़ांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरील ‘ब्रँड’ म्हणून स्थिरस्थावर झालेल्या ‘ट्री हाउस’ नर्सरी शाळेच्या देशभरातील अनेक शाखा अचानकपणे बंद करण्यात आल्या. यासाठी कंपनीची चुकलेली बाजारपेठीय गणिते कारणीभूत असल्याचे बोलले जात असले, तरी या निमित्ताने देशभर फोफावलेल्या खासगी नर्सरी शाळांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. गेली काही वर्षे दरवर्षी ३० टक्क्य़ांपेक्षा जास्त दराने विकसित होत जाणाऱ्या या बाजारपेठेला आता उतरती कळा लागली आहे. अगदी दोन इमारती ओलांडल्या की एखाद्या घरात सुरू असणाऱ्या अनेक नर्सरी शाळा आता पालकांच्या प्रतिसादात फरक पडल्याचे सांगत आहेत.

देशभरात तीनशेच्या आसपास ब्रँड, हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या नर्सरी शाळांच्या बाजारपेठेला आता धक्के बसू लागले आहेत. बँड्र म्हणून स्थिरस्थावर झालेल्या शाळांसाठीही पालकांचा प्रतिसाद घटत चालला आहे. त्यामुळे या विस्तारलेल्या बाजारपेठेने आता प्राथमिक खासगी शाळा सुरू करण्याकडे आपला मोहोरा वळवला असून काही बँड्र्सच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही बँ्रॅड्सनी याबाबत घोषणा केल्या आहेत.

देशातील वाढती लोकसंख्या, साक्षरतेचे वाढते प्रमाण, नोकरी करणाऱ्या महिलांची वाढलेली संख्या, छोटी कुटुंब पद्धती अशा अनेक मुद्दय़ांचे दाखले देत नर्सरी शाळा सुरू करण्याचा व्यवसाय देशभर फोफावला. शहरी पालकांच्या गरजांचे भांडवल करून सुरू झालेल्या या अनियंत्रित बाजाराची भरभराट गेल्या काही वर्षांत झाली. फक्त पूर्वप्राथमिक शिक्षण देणारे अनेक राष्ट्रीय स्तरावरील बँॅड्र्स निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या शाखाही शहरी, निमशहरी भागांत सुरू झाल्या. स्थानिक पातळीवर कुटीरोद्योगाच्या स्वरूपात नर्सरी शाळा सुरू झाल्या. सुरुवातीला मर्यादित असणाऱ्या शाखा आणि ब्रँड्समुळे पालकांचा प्रतिसाद या शाळांना मिळत होता. आता मात्र वाढती स्पर्धा, पालकांची बदलती मानसिकता यामुळे या शाळांना पालकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादात घट होऊ लागली आहे. सुरुवातीला ३० टक्के वाढ असणाऱ्या या व्यवसायात सध्या २० टक्केच वाढ असल्याची नोंद बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या कंपन्यांनी केली आहे.

 

प्राथमिक, माध्यमिक शाळा असलेल्या शिक्षणसंस्थांनी पूर्वप्राथमिकचेही वर्ग सुरू केले आहेत. या शाळांमध्ये ‘शिक्षण’ मिळण्याची हमी आणि पुढील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो. त्याचप्रमाणे आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळांनीही आता पूर्वप्राथमिकसाठी अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे फक्त पूर्वप्राथमिक शाळा चालवणाऱ्या ब्रँड्सपेक्षा एखाद्या शिक्षणसंस्थेच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच जुन्या, प्रतिष्ठित शाळांनीही आता पूर्वप्राथमिकपासूनच शिक्षण सुरू केले आहे. त्याचा फटका आता नर्सरी शाळांना बसू लागला आहे. घरगुती पद्धतीने चालणाऱ्या नर्सरी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची पालकांची मानसिकताही बदलली आहे.

 

 

होमस्कूलिंगचा ट्रेंड

होमस्कूलिंग म्हणजे मुलांना घरीच शिकवण्याचा ट्रेंड अजून फोफावला नसला, तरी त्याची सुरुवात झाली आहे. शाळेत जाण्यापूर्वी आवश्यक असलेली तयारी घरीच करून घेण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. शाळांबद्दल वाटणारी असुरक्षितता, भरमसाठ शुल्क आणि काय शिकायचे याबद्दल हवे असणारे स्वातंत्र्य अशा कारणांमुळे होमस्कूलिंगचा ट्रेंड वाढत आहे. याबाबत अपूर्वा कुलकर्णी या पालकांनी सांगितले, ‘मी मुलीला नर्सरी स्कूलमध्ये घातलेले नाही. रंग, आकार, अक्षरे यांची प्राथमिक ओळख मी तिला घरीच करून देते. त्याचप्रमाणे मला कंपनीकडून घरून काम करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे मुलीला कुठे ठेवायचे हा प्रश्न उद्भवत नाही.’

 

स्पर्धा शिगेला

नर्सरी शाळांच्या विविध ब्रँड्समधील स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांत तर अगदी दर एका किलोमीटरच्या परिसरात सहा ते सात ब्रँडेड शाळा आणि तितक्याच स्थानिक शाळा दिसून येतात. ब्रँडेड शाळांच्याही एकाच भागांत अनेक शाखा थाटलेल्या आहेत. त्यामुळे पालकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही संख्येत घट होते आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँड्स बरोबर सध्या स्थानिक शिक्षण संस्थांच्या नर्सरी शाळांची स्पर्धा सुरू आहे. मुळात स्थानिक संस्थांचे नाव रुजलेले असल्यामुळे या संस्था या स्पर्धेत टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँडसच्या नर्सरी शाळांना आता भारतीय बँड्र्सबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. याबाबत किडझी या शाळेच्या शाखेतील संचालकांनी सांगितले, ‘गेल्या दोन वर्षांत शाळेच्या जवळ आणखी तीन शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवेशांची विचारणा कमी झाली आहे. पूर्वी शाळेतील सर्व जागा प्रवेश सुरू झाल्यावर लगेचच भरल्या जात होत्या. या वर्षी शाळा सुरू झाल्यानंतरही आम्ही काही प्रवेश दिले.’

ब्रँड्सची नक्कल

ब्रँडेड नर्सरी शाळांची नावे, लोगो याचा स्थानिक किंवा घरगुती नर्सरी शाळांकडून सर्रास वापर होतो आहे. ब्रँड्सच्या नावाचीच फक्त ओळख असल्यामुळे या बनवाबनवीला पालक बळी पडत आहेत. एखाद्या ब्रँडची शाखा सुरू करायची. त्यानंतर ती जागा घरगुती नर्सरी शाळेला विकून टाकायची, अशा प्रकारांचा परिणाम उलाढालीवर होऊ लागला आहे. वाढलेल्या स्पर्धेचे आडाखे बांधून पूर्वप्राथमिक शाळांच्या व्यवसायिकांनी आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फक्त पूर्वप्राथमिक शाळांचा प्रतिसाद कमी होऊ लागल्यानंतर आता यातील काही ब्रँड्सनी आता आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळाही सुरू केल्या आहेत.

 

 

Story img Loader