पुणे : धावत्या रेल्वे गाडीत दोन परिचारिकांनी प्रसंगावधान राखून बेशुद्ध पडलेल्या तरुणीवर केलेल्या प्रथमोपचारामुळे २८ वर्षीय युवतीला जीवनदान मिळाले. ही घटना १४ एप्रिल रोजी दौंड पुणे डेमू या रेल्वेत घडली. प्राजक्ता असुर्लेकर आणि ज्योती सुल या परिचारिकांंनी प्रसंगावधान राखून तरुणीचे प्राण वाचविले. दोघी जहांगिर रुग्णालयातील परिचारिका आहेत. दौंड-पुणे डेमू ही दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याच्या दिशेने येत होती. ही गाडी सकाळी आठ वाजता यवत आणि उरळी स्थानकादरम्यान आली असता तरुणीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ही बाब प्राजक्ता आणि ज्योती यांना समजताच प्राजक्ता यांनी वेळ न दवडता तिला कार्डिओ पल्मनरी रेससिटेशन (सीपीआर) देत प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली. साडेआठच्या सुमारास रेल्वे गाडी उरुळी स्थानकावर पोहचताच दोघींनी अन्य प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणीला स्थानकावर उतरवले. त्या वेळी त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचे आवाहन केले. रुग्णवाहिका येईपर्यंत दोघींनी तरुणीला सतत ‘सीपीआर’ देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती.

रुग्णवाहिका आल्यानंतर प्राजक्ता आणि ज्योती यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि तरुणीला तत्काळ उरळी येथील एका खासगी रुग्णालयात रवाना केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर प्राजक्ता यांनी तरुणीच्या मोबाइलमधून कुटुंबातील व्यक्तींना संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

या प्रसंगात प्राजक्ता आणि ज्योती सुल यांनी दाखवलेले धाडस, माणुसकी व तत्परता कौतुकास्पद ठरली. त्यांच्या कृतीमुळे केवळ तरुणीला जीवनदान मिळण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रसंगावधान राखावे, याचा संदेश दिला.