पुणे : पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, राज्यात शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणीसह शाळा स्तरावरील परीक्षा याच काळात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या, की पोषण पंधरवड्यातील उपक्रम घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोषण पंधरवडा साजरा करण्याबाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व, निरोगी आरोग्यबाबत जनजागृती, स्वच्छतेबाबत संवेदनशील करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

पोषण पंधरवडा उपक्रमात जागरूकता कार्यक्रम, पोषण साक्षरता मोहिमेत फलक, नाटुकली, चित्रफिती तयार करणे, स्वदेशी खेळण्यांचा मेळावा, चित्रकला, निबंध लेखन, भाषण, प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोषण नायक-नायिका निवड असे उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या सहभागातून उपक्रम राबवून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी २ घेतली जाणार आहे. तसेच, शाळा स्तरावरील परीक्षाही होणार आहेत. या वेळापत्रकामुळे यंदा शालेय कामकाज एप्रिलअखेरपर्यंत लांबणार आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी परीक्षांमध्ये व्यग्र असताना आता पोषण पंधरवड्याच्या उपक्रमांचा नवा भार त्यांच्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे संयोजक विक्रम अडसूळ म्हणाले, ‘पोषण पंधरवडा उपक्रमाची कल्पना चांगली आहे. मात्र, त्याची वेळ चुकली आहे. ऐन परीक्षांच्या काळात हा उपक्रम राबवणे शक्य नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर हा उपक्रम राबवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.’
कोट

परीक्षांच्या काळात पोषण पंधरवडा उपक्रम राबवणे चुकीचे आहे. शिक्षकांना परीक्षांचे काम करावे लागत असताना पोषण पंधरवड्यातील उपक्रमांचे आयोजन करणे शक्य होणार नाही. त्याशिवाय उन्हाची तीव्रता वाढत असताना असे उपक्रम राबवणे शक्य नाही. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक