विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी सुरू झालेली पोषण आहार योजना आता दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी आधार ठरणार असून सुट्टय़ांमध्येही शाळेत पोषण आहार मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागात सुट्टय़ांच्या काळातही शाळांमध्ये पोषण आहार योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
गेली अनेक वर्षे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजन दिले जाते. मुळात विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, आता दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्यासाठी ही योजना उपयोगी ठरली आहे. मात्र, त्याचबरोबर आता सुट्टय़ांच्या काळातही ही योजना विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये रोज माध्यान्ह भोजन दिले जाते. दुष्काळग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टय़ांच्या काळातही पोषण आहार योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
ज्या शाळा या योजनेमध्ये समाविष्ट होतात, त्या सर्व शाळांमध्ये सध्या येऊ घातलेल्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही योजना शाळांमध्ये सुरू राहणार आहे. सध्या या योजनेचा विचार हा मोठय़ा सुट्टय़ांपुरताच करण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये सुट्टय़ांमध्ये ही योजना सुरू राहील, त्या शाळांतील शिक्षकांवर त्याच्या अंमलबजाणीची जबाबदारी राहणार आहे. याबाबत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सांगितले, ‘दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे कुपोषण होऊ नये. त्यांना नियमित पोषक अन्न मिळावे यासाठी पोषण आहार योजना सुट्टय़ांमध्येही सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या ही योजना मोठय़ा सुट्टय़ांसाठीच आहे. आठवडय़ाच्या सुट्टीसाठी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. शाळेत नियमित ज्या प्रकारे आहार दिला जातो, तसाच सुट्टय़ांच्या काळात देण्याबाबत शाळांना सूचना दिल्या जातील.’