परभणीतील मूक मोर्चादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्याचदरम्यान काल परळी शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
या सर्व घडामोडींदरम्यान आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानप, मंगेश ससाणे यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा राज्यातील ओबीसी समाज निषेध व्यक्त करीत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पण, काही दिवसांपासून राज्यभरात मोर्चे काढून, एका समाजाला लक्ष्य केले जात आहे. हे योग्य नसून, दोन दिवसांपूर्वी परभणी येथील मोर्चादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घरात घुसण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहात आणि घरात घुसून काय करणार आहात, याबाबत उत्तर द्या. तुमच्या या विधानामुळे महाराष्ट्र पेटला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की, आपल्या राज्यात कोणी जर अशा प्रकारचे विधान करीत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पाहत असेल, तर अशा व्यक्तीवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.