पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे आरक्षणाच्या प्रश्नामध्ये पडून हिरो होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा बळीचा बकरा झाला आहे. आता त्यांनी राजीनामा देऊन मैदानात यावे, असे आव्हान माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिले.पुण्यात पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘भुजबळ हे प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये असतात. मात्र, कालांतराने ते वेगळी भूमिका घेतात. भुजबळ यांच्या चुकीच्या वक्तव्यांना आमचा पाठिंबा नाही’
‘आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटे पडले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलताना दिसत नाहीत. भुजबळ यांनी सभा घेऊन आणि टाळ्यांची भाषणे करून वातावरण निर्मिती केली. राज्य सरकारने ओबीसींची भीती बाळगू नये, असेही राठोड म्हणाले.‘सर्वच समाजातील नेत्यांनी संयमाने भाषा वापरावी. सध्या मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत. त्यांनी ‘लायकी’ हा शब्द मागे घेतला आहे. जनतेचे समाधान होत नसेल तर त्यांनी माफी मागावी’ असे राठोड यांनी नमूद केले.