पुणे : ‘संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याच्या भूमिकेतून राज्यातील वातावरण जाणीवपूर्वक कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असून, रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करण्यात यावी,’ अशी मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केली. संभाजीराजेंच्या भूमिकेला धनगर समाज म्हणून आमचा विरोध असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले. रायगड किल्ल्याचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. मात्र, आता किल्ल्याचे संवर्धन सोडून किल्ल्याचे नुकसानच केले जात आहे, अशी टीका हाके यांनी केली.
पत्रकार परिषदेत हाके म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा, म्हणून होळकरांनी मोठी मदत केली. लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि होळकरांच्या भूमिकेवरही संभाजीराजेंना आक्षेप आहे का? त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा होतो, हे सांगावे. अशा प्रकारच्या भूमिकांमुळे सामाजात तणावाची परिस्थिती निर्माण होते. काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे.’
३१ मार्च हीच तारीख कशासाठी ?
रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी स्मारक काढण्यासाठी राज्य सरकारला ३१ मार्च अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ३१ मार्चला आम्ही पंतप्रधानांना चौंडीत बोलणार आहोत. मग, अशा वेळी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून आंदोलन का केले जात आहे? ३१ मार्च हीच तारीख कशासाठी निवडण्यात आली, असे प्रश्न विचारत हाके यांनी धनगर समाज म्हणून आमचा या भूमिकेला विरोध असल्याचे स्पष्ट केले.
औरंगजेबाच्या कबर काढली तर इतिहास पुसणार आहे का ?
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अशी मागणी एका बाजूने केले जाते. ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. त्यावेळी औरंगजेबाच्या कबर काढण्याच्या मागणीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता औरंगजेबाची कबर काढली तर इतिहास पुसणार आहे का? औरंगजेब होता हे नाकारता येणार आहे का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी या वेळी उपस्थित केला.