बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारी लठ्ठपणाची (ओबेसिटी) समस्या हा काही नवा मुद्दा नाही..पण आता मालकांच्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम हा त्यांच्या कुत्र्यांवरही दिसू लागला आहे. आता कुत्र्यांसाठीही ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोगॅ्रम्स सुरू झाले आहेत.
पाळलेला कुत्रा, मांजर जेवढं गुबगुबीत, तेवढं ते छान.. हा पारंपरिक समज! मात्र, आतापर्यंत कुत्र्या-मांजरांचा कौतुकाचा असणारा गुबगुबीतपणा हा आता लठ्ठपणात बदलला आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, जास्त खाणे, पुरेसा व्यायाम नसणे अशाच कारणांमुळे आता कुत्र्यांमध्येही लठ्ठपणाची समस्या दिसू लागली आहे. त्यामुळे अर्थातच घरातल्या या सदस्याचा लठ्ठपणा कमी करण्याची जबाबदारीही आता व्यावसायिक घेऊ लागले आहेत. कुत्र्यांसाठी ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅम्स आणि त्याची ट्रेनिंग सेंटर्स पुण्यात सुरू झाली आहेत. यामध्ये कुत्र्यांच्या खाण्याच्या सवयी, खाण्याचे प्रमाण, कुत्र्याला मिळणारा व्यायाम या सगळ्याचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणे प्रत्येक कुत्र्यासाठी स्वतंत्र दिनक्रम तयार केला जातो. कुत्र्याला कशाप्रकारचे खाणे द्यायचे, किती वेळ फिरायला न्यायचे, कोणत्या वेळी न्यायचे असा कार्यक्रम डॉग ट्रेनर्सकडून आखला जातो. कुत्र्यांना व्यायाम होईल असे खेळ तयार केले जातात. अनेकवेळा डॉग ट्रेनिंग करताना ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅमबाबत मालक चौकशी करत असल्याचे डॉग ट्रेनर्स सांगतात. लठ्ठपणाची समस्या असलेल्या कुत्र्यांसाठी अनेक कंपन्यांनी विशेष खाणेही बाजारात आणले आहे. साधारणपणे ६०० ते २००० रुपये किलो अशी या खाण्याची किंमत आहे.
घरी कुत्रा आणला जातो. मात्र, त्यानंतर त्याला नियमित, ठराविक वेळी फिरवणे यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. सुरूवातीच्या काळात उत्साह असतो. मात्र, रोज सकाळी उठून कुत्र्याला फिरायला नेणे हळूहळू बारगळू लागते. त्याचवेळी बाजारात मिळणारे तयार खाणे कुत्र्याला दिले जाते. ते किती प्रमाणात दिले पाहिजे याबाबतही अनेकवेळा मालकांना पुरेशी माहिती नसते. या सगळ्यामुळे कुत्र्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसते. मात्र, ‘‘कुत्र्यांचाही दिनक्रम आणि खाण्याच्या सवयी बदलल्या तर ही समस्या आटोक्यात येऊ शकते,’’ असे ओबेसिटी मॅनेजमेंट करणारे अभिषेक कुलकर्णी यांनी सांगितले. यामध्येही, घरी येऊन ट्रेनिंग देण्याबरोबरच अशा कुत्र्यांसाठी हॉस्टेल्सही उपलब्ध आहेत. एका दिवसासाठी किमान चारशे रुपये या प्रमाणे शुल्क आकारले जाते. कुत्र्याला असणारी समस्या आणि त्याला द्यावे लागणारे उपचार यांनुसार शुल्क आकारले जाते.
‘‘कुत्र्यांमध्ये आता लठ्ठपणाची समस्या मोठया प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे डायबेटिस, हृदयाचे विकार होण्याचा धोका कुत्र्यांनाही असतो. त्यासाठी त्यांचे खाणे आणि व्यायाम याची जागरूकतेने काळजी घेणे गरजेचे आहे. कुत्र्याची जात, वय यांनुसार त्याचे वजन आणि आकारमानाचे चार्ट्स आहेत, त्यानुसारच कुत्रे असल्यास ते निरोगी राहते.’’
– डॉ. विनय गोऱ्हे