कविता आणि गीतलेखनाबरोबरच संगीत, रंगमंचीय कार्यक्रम, चित्रकला, कला प्रांतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे सुधीर मोघे यांच्या निधनाने मनस्वी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी सुधीर मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आनंद मोडक – मोहन गोखले याच्याप्रमाणेच सुधीर मोघे हा माझ्यासाठी मितवा म्हणजे मित्रापलीकडचा होता. २० व्या शतकामध्ये महाराष्ट्रात पुलं हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व झाले. त्या परंपरेतील सुधीर आहे असे मला वाटते. शब्दांचा कंटाळा आल्यावर चित्रमाध्यमातून तो व्यक्त झाला. सहसा कवी हा केवळ आपल्याच कवितांवर प्रेम करतो. पण, असंख्य कवींच्या वेगवेगळ्या कविता मुखोद्गत असणारा सुधीर हा एकमेव कवी असेल.
सलिल कुलकर्णी – अनेक वर्षे पाठीवर असलेला मायेचा आणि विश्वासाचा हात काढून घेतला गेल्यामुळे पोरकेपणा आला असे वाटते. कविता आणि गाण्याकडे पाहण्याची नजर त्यांनी शिकविली. मनाला पटेल तेवढेच करायचे असे मनस्वीपणाने ते जगले. कुसुमाग्रज, गदिमा, साहिर, गुलजार यांच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. सातत्याने लढणाऱ्या या कवीला आजाराने त्या बाजूला न्यावे हे अपेक्षित नव्हते.
प्रा. प्रकाश भोंडे – स्वरानंद संस्थेच्या आपली आवड कार्यक्रमाच्या निवेदनाने सुधीर मोघे यांची कारकीर्द सुरू झाली. या संस्थेचे गेली १७ वर्षे ते अध्यक्ष होते. ‘मराठी भावगीतांचा इतिहास’ लेखनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या काळातच मोघे आपल्यातून निघून जावेत हे आपले दुर्दैव आहे. स्वरानंद संस्थेतर्फे गजाननराव वाटवे स्मृती नवे शब्द नवे सूर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
संदीप खरे – कवी म्हणून कोणालाही माहीत नव्हतो तेव्हापासून मोघे यांनी माझी पाठराखण केली. तडजोड न करता जे पटेल तेच काम मनापासून करणारे मनस्वी, हरहुन्नरी आणि कलंदर व्यक्तिमत्त्व असेच मी त्यांचे वर्णन करेन. माझ्या कवितासंग्रहासाठी त्यांनी मनोगत लिहिले आहे.
‘शब्दधून’चा मी साक्षीदार
सुधीर गाडगीळ – १९७८ ते १९८५ या कालावधीत दादर येथील अरुण काकतकर यांच्या मठीमध्ये त्यावेळी उमेदवारी करणाऱ्या आम्हा युवकांची मैफल जमायची. तेथे सुधीरच्या कविता आम्ही पहिल्यांदा ऐकल्या. त्याचे शब्दांवरचे प्रेम जाणवले. या मैफलीमध्ये कित्येकदा पं. जितेंद्र अभिषेकीबुवा आणि सुधीर फडके श्रोत्यांमध्ये असायचे. मराठी भावसंगीतामध्ये दृक-श्राव्य माध्यमाचा उपयोग करून ‘स्मरणयात्रा’ हा कार्यक्रम साकारण्याची संकल्पना सुधीर याचीच होती. जागतिक मराठी परिषदेमध्ये या कार्यक्रमाच्या निवेदनाची सूत्रे त्याने मी आणि शैला मुकुंद यांच्या हाती सुपूर्द केली होती.

Story img Loader