विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राज्यपातळीवर घेतल्या जाणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या ‘आविष्कार’ स्पर्धेचा निकाल पारदर्शक नसल्याची कुरबूर पुणे विद्यापीठामध्ये सुरू झाली आहे. हे पुरस्कार मॅनेज केले जात असल्याची राज्यपालांकडे तक्रार करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे या वर्षीचे ‘आविष्कार’ वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत.
यावर्षी ‘आविष्कार’चे संयोजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे होते. या स्पर्धेचे निकाल ‘मॅनेज’ करण्यात आल्याचे पुणे विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार’मध्ये पारितोषिके पटकावली आहेत. मात्र, यावर्षी मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठातील ४८ विद्यार्थी सहभागी झाली होते. त्यातील २७ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली होती. त्यातील ४ विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली आहेत. आयोजक असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे १३ विद्यार्थी दुसऱ्या फेरीत पोहोचले होते, त्यातील ९ विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली आहेत. मुंबई विद्यापीठाचे २२ प्रकल्प दुसऱ्या फेरीत पोहोचले होते.
या निकालावर पुणे विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत. स्पर्धेचे निकाल पारदर्शक नसल्याबाबत राज्यपालांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader