अनोळखी व्यक्तीचा व्हॉट्स अॅप वर व्हिडिओ कॉल आला तर तो उचलू नका असे अनेकदा सांगितले जाते. मात्र या सल्ल्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील एका सामाजिक कार्यकर्ता महिलेला अनोळखी व्यक्तीच्या व्हॉट्स अॅप कॉलचा विक्षिप्त अनुभव आला. बुधवारी दुपारी महिलेला अनोळखी नंबर वरून व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉल आला. तो महिलेने उचलला असता त्या कॉलमधील व्यक्ती अश्लील हावभाव करत असताना त्यांना दिसलं. त्या महिलेने तातडीने व्हिडिओ कॉल कट करून पोलिसांमध्ये धाव घेतली. याप्रकरणी महिलेने संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्ता या पिंपरी-चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे राहतात. बुधवारी त्या आपल्या घरी असताना अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल करू का असा फिर्यादी महिलेच्या व्हाट्सऍपवर मॅस्सेज आला. त्यानंतर महिलेने संबंधित व्यक्तीला कॉल करून तुम्ही कोण आहात?, माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा केली. मात्र समोरून काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांना काही मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल आला तो त्या महिलेने उचलला. तेव्हा तो कॉल अश्लील असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे ती महिला घाबरली. त्यांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केला आला असून व्हिडिओ कॉल केलेल्या नंबरवरून अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान अश्या प्रकराचे अनोळखी व्हाट्स अॅप क्रमांकावरील व्हिडिओ कॉल महिलांनी उचलू नयेत असे आवाहन सांगवी पोलिसांकडून करण्यात आले आहे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या मॅसेजेसला उत्तरही देखील देऊ नये असं देखील पोलीस म्हणाले आहेत. तसेच व्हॉट्स अॅप जपून वापरणे गरजेचे असल्याचे मतही पोलिसांनी व्यक्त केले आहे.