पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनांतील स्थान उंचावणे, संशोधन, बौद्धिक स्वामित्व हक्क आणि नवोपक्रम, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीयकरण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांशी परस्पर सहकार्याद्वारे संशोधन अनुदान, तसेच विद्यापीठ अमृत महोत्सव आणि जी २० परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणे अशी उद्दिष्ट्ये विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेने निश्चित केली आहेत. या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी कृती समिती स्थापन करण्यात आली.
सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या विद्यापीठ सल्लागार परिषदेची पहिली बैठक विद्यापीठात झाली. ज्येष्ठ उद्योगपती संजय किर्लोस्कर हे या परिषदेचे अध्यक्ष असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून राजेश पांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती आण् तंत्रज्ञान तज्ज्ञ राज शेखर जोशी आदी परिषदेचे सदस्य आहेत. जागतिक स्तरावर विद्यापीठाचा स्तर उंचावण्यासाठी कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार परिषद नियुक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे: कारखान्यांकडून २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती; साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा
कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आणि विकासाचा आढावा सादर करताना विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष, आगामी जी २० परिषदेटी बैठक या बाबतच्या योजनांची माहिती दिली. डॉ. काळे म्हणाले, की विद्यापीठ सल्लागार परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यापीठाला भविष्यातील वाटचालीसाठी मोलाचे ठरणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: शिरूर ते कर्जत नवा महामार्ग
अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावलेला आहे. आगामी काळात उपलब्ध असलेल्या जागतिक संधींचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.- संजय किर्लोस्कर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार परिषद