राज्य सरकारने यंदा दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचा संच अवघ्या शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या संचचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, पुरेसे संच उपलब्ध नसल्याने अवघ्या आठ दिवसांवर दिवाळी आली असतानाही केवळ २० टक्के शिधापत्रिकाधारकांना या संचचे वाटप करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात तीन लाख ३० हजार ८११ अंत्योदय आणि प्राधान्य शिधापत्रिकाधारक आहेत, तर ग्रामीण भागात पाच लाख ८५ हजार ४५४ प्राधान्य कुटुंब आणि ४९ हजार ३०२ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. असे एकूण नऊ लाख १६ हजार कुटुंबांची यादी राज्य शासनाकडे पाठवून दिवाळी संचाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत २० टक्के संचांचा पुरवठा झाला आहे.याबाबत बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने म्हणाल्या, की राज्य शासनाला उर्वरित ८० टक्के लाभार्थ्यांची माहिती पाठवून शिधा संचाची मागणी करण्यात आली आहे. हा शिधा संच प्राप्त होताच त्याचे वाटप केले जाईल. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वेळ पडल्यास शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवून शिधा संचांचे वितरण करण्यात येईल.