सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात (आचार्य आनंदऋषीजी चौक) दुमजली उड्डाणपूल उभारणीच्या कामाला वाहतूक पोलिसांनी ना-हरकत दिली आहे. त्यामुळे चौकात अडथळे उभारून (बॅरिकेडींग) उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, विद्यापीठ चौकातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून वाहतूक पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर अडथळे उभारण्यास पीएमआरडीएला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले नव्हते.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि टाटा-सिमेन्सचे अधिकारी यांची बैठक झाली. पुलाच्या कामासाठी अडथळे उभारल्यानंतर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे परवानगी दिल्यानंतर पोलिसांकडून ते वारंवार काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे चौकात पुलाचे काम सुरू करता आले नाही, असे पीएमआरडीकडून सांगण्यात आले. या अडथळ्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर चर्चा होऊन बैठकीत पोलिसांनी चौकात काम सुरू करण्यास परवानगी द्यावी. पावसाळ्यापूर्वी चौकातील शक्य असेल तेवढे काम गतीने कंपनीने मार्गी लावावे, असा निर्णय घेण्यात आला. त्याला पोलिसांनी मान्यता दिली. त्यामुळे आता चौकात कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत अडथळे करण्यास यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. आता प्रत्यक्षात चौकात कामास सुरुवात केली जाणार आहे.
जी-२० परिषदेमुळे कामाला विलंब
मध्यंतरी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘पुम्टा’ची बैठक झाली. या बैठकीत महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने परवानगी देण्याचे आदेश राव यांनी दिले होते. तसेच विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर अडथळे उभारण्यास पीएमआरडीएला परवानगी देण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. पुलाचे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून काम सुरू करावे, अशा सूचना पीएमआरडीएला दिल्या. मात्र, जी-२० परिषदेमुळे हे काम पुन्हा लांबणीवर पडले होते.