पुणे : तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेला सोमवारी दोन तास विलंब झाला. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडली. नियोजित वेळेपेक्षा विलंब झाल्याने परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएस’ कंपनीला भूमी अभिलेख विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसल्याची स्पष्टोक्ती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 तलाठी भरतीसाठी यंदा १० लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. सोमवारी सकाळचे पहिले सत्र नऊ ते ११ या वेळेत होणार होते. मात्र, टीसीएस कंपनीच्या डाटा सेंटर सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तासांच्या विलंबानंतर हे सत्र सुरू झाले. टीसीएस कंपनी आणि त्यांचे डाटा सेंटर यांनी देशभरातील परीक्षांबाबत हा तांत्रिक बिघाड झाल्याचे भूमी अभिलेख विभागाला कळविले. त्यानंतर तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रथम सत्रातील परीक्षा विलंबाने सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.      

दरम्यान, टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करून राज्यातील सर्व ११५ केंद्रांवर सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू करण्यात आली. पहिल्या सत्राला विलंब झाल्याने साहजिकच त्यानंतरच्या दोन्ही सत्रांनाही दोन तास विलंब झाला. याबाबतची माहितीदेखील स्थानिक प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दिव्यांग उमेदवारांना सोमवारच्या दुसऱ्या सत्रात अतिरिक्त असणारा वेळही देण्यात आला. याबाबत शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेही अप्पर जमाबंदी आयुक्त रायते यांनी सांगितले.

सोमवारी तांत्रिक कारणांमुळे परीक्षेला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. नेमका कशामुळे विलंब झाला, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील सत्रातील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. – आनंद रायते, अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstacles in talathi recruitment exam two hours delay due to technical difficulties ysh