पिंपरी : काळेवाडी फाटा ते चिखलीतील देहू-आळंदी या ११ किलोमीटरच्या ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट’ (बीआरटी) मार्गावरील चिंचवड ऑटो क्लस्टर, आयुक्त निवासस्थानासमोरील अडथळा दूर झाला आहे. या मार्गावरील एक औद्योगिक इमारत पाडून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे १४ वर्षांपासून रखडलेला हा बीआरटी मार्ग सुरू झाला आहे.
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्याच्या बीआरटी मार्गावरील ऑटो क्लस्टर, आयुक्त निवासस्थानासमोरील युरोसिटी व इंड्रोलिक इंडस्ट्रिअलची जागा महापालिकेच्या ताब्यात आली नव्हती. त्यामुळे तेथे बीआरटी मार्गाचा रस्ता तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे पीएमपी बससह इतर वाहनांना एक किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. बीआरटी मार्गास अडथळा ठरणाऱ्या या उद्योगांचे स्थलांतर करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागा देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला सात कोटी रुपये दिले होते. कंपनीची इमारत पाडण्याचे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये हाती घेतले. ४५ मीटर रुंदीच्या या रस्त्यापैकी २५ मीटरची जागा ताब्यात आली. पाडकाम झाल्यानंतर २०० मीटर लांबीचा रस्ता बनविण्यात आला आहे. त्यासाठी तीन कोटींचा खर्च झाला आहे. रस्ता पूर्ण झाल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वळसा न घालता थेट ये-जा करता येत आहे. एमआयडीसीकडून उर्वरित जागा ताब्यात आल्यानंतर पूर्ण क्षमतेने रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
कोंडी सुटली
बीआरटी मार्ग एकसलग झाल्याने ऑटो क्लस्टर येथील चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला आहे. वाहनचालकांना आयुक्त निवासस्थानासमोरून वळसा घालून ये-जा करणे बंद झाले आहे. त्यामुळे इंधन, वेळेची बचत होणार आहे. या मार्गावरुन बीआरटी बस धावण्यास सुरुवात झाली आहे.
बीआरटी मार्ग अखंडपणे सुरू नसल्याने ऑटो क्लस्टर येथे मोठी वाहतूककोंडी होत होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, आता या मार्गावरून अखंडपणे बीआरटीतून बस धावतील. त्यामुळे कोंडी सुटणार आहे.तुषार हिंगे,माजी उपमहापौर
बीआरटी मार्गास ऑटो क्लस्टरसमोरील दोन कंपन्यांच्या इमारतींचा अडथळा होता. कंपन्यांचे भोसरीत स्थलांतर करण्यात आले आहे. एक इमारत पाडून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या कंपनीची इमारत एमआयडीसीकडून ताब्यात आल्यानंतर ती पाडून संपूर्ण रस्ता बनविला जाईल. पावसाळी गटार, जलनिस्सारण वाहिनी, बीआरटीचे सुरक्षा कठडे टाकण्याचे काम पाच महिन्यांंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हा रस्ता एकसमान होईल. तोपर्यंत रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.प्रमोद ओंभासे,मुख्य अभियंता,स्थापत्य (प्रकल्प) विभाग,पिंपरी-चिंचवड महापालिका