पुणे : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने आता काही बदल केले आहेत. या बदलांमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. गाडीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्येही भर पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस गाडीत दोन नवीन बदल करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यात डब्यांतील स्वच्छतागृहांमध्ये गंध सेन्सर बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. हे सेन्सर सध्या प्रायोगिक पातळीवर बसविण्यात आले आहेत. स्वच्छतागृहाच्या वातावरणातील गंध पातळीचे परीक्षण हे सेन्सर करणार आहेत. वासाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे आढळून आल्यानंतर हे सेन्सर स्वच्छता कर्मचाऱ्यांना इशारा देणारा संदेश तातडीने पाठवतात.

आणखी वाचा-पिंपरी : महापालिकेकडून मालमत्ता करबुडव्यांचा शोध सुरू; ‘या’ भागात होणार तपासणी

वंदे भारतच्या ब्रेक यंत्रणेत काही बदल करण्यात आले आहेत. गाडीला प्राणी धडकल्यानंतर ब्रेक यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी मेन रिझर्व्हायर आणि ऑटो ड्रेन व्हॉल्व यांना जोडणाऱ्या न्यूमॅटिक पाईपची स्थिती बदलण्यात आली आहे. आधी हा पाईप डब्याच्या पुढील दिशेने वळलेला असे. आता तो मागील बाजूला वळवून बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्राण्याची गाडीला धडक बसल्यानंतरही या पाईपला धक्का बसत नाही आणि ब्रेकमध्ये बिघाडही होत नाही. या प्रयोगाला यश मिळाल्याने इतरही गाड्यांमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.

सर्वच गाड्यांमध्ये गंध सेन्सर?

गंध सेन्सरच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना अस्वच्छता असलेल्या स्वच्छतागृहाची माहिती तातडीने मिळते. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी त्यामुळे कर्मचारी जलद पावले उचलू शकतात. वंदे भारतमधील गंध सेन्सरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे गंध सेन्सर इतर सर्वच गाड्यांच्या डब्यांमध्ये बसविण्यात येणार आहेत. यामुळे सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांच्या स्वच्छ व सुखकर प्रवासासाठी मदत होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odor sensors have been installed in toilets of vande bharat coaches pune print news stj 05 mrj