Deenanath Mangeshkar Hospital Controversy: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप झाल्यानंतर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या नातेवाईकच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी आता भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल करणअयात आले आहेत. भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना २८ मार्च रोजी प्रसूतीसाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाने आधी २० लाख आणि नंतर १० लाख आगाऊ भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यामुळे रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला, असा आरोप केला जात आहे.
सदर प्रकरण बाहेर आल्यानंतर काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर भाजपाच्या वतीनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला. तनिशा भिसे यांच्याकडे मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत भिसे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे डॉ. घैसास यांना जाब विचारण्यासाठी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र त्यांनी घैसास यांच्या नातेवाईकांच्या रुग्णालयाची तोडफोड केली.
पुण्यातील नवसह्याद्री सोसायटी येथील डॉ. चिन्मय घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होमवर धाड टाकून महिला आंदोलकांनी तोडफोड केली. मात्र आता भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना हे आंदोलन भोवले आहे.
तोडफोड करणाऱ्या महिलांवर दंगलीच्या आरोपाखाली महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स (हिंसाचार प्रतिबंधक आणि मालमत्तेचे नुकसान) कायदा, २०१० च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णालयावरील आरोपावर कोण काय म्हणाले?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने झालेल्या महिलेच्या मृत्यूची दखल शासनाने घेतली आहे. ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याची सूचना मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. रुग्णालयाचे आणि संबंधित कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री
उपचार घेणे हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात नेमकी काय चूक झाली आहे, याची तपासणी केली जाईल. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी चूक केली असेल, तर या चुकीला माफी नाही. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अद्यायावत सुविधा असलेल्या रुग्णालयात पैशांअभावी त्या नाकारल्या जाणे ही गंभीर बाब आहे. प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू होऊ नये, असे आरोग्यसेवेचे धोरण असायला हवे. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)