सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील मनसैनिकांनी 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तसेच त्याला सोशल मीडियावर माफी देखील मागायला लावण्यात आली असून यापुढे सोशल मीडियावर राज ठाकरेंविरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे.
पुण्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. मनसैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात राहत असल्याचे उघड झाले. पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनविसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी त्या तरुणाच्या घरी पोहोचली. मनसैनिकांनी त्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या. यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनसैनिक चिडले होते, पण त्या तरुणाच्या घरी गेल्यावर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. त्याचे घर भाड्याचे आहे, तर वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याला मारहाण न करता उठाबशा काढायला लावल्या, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.