गुंतवणूक केलेल्या पैशावर बारा टक्के दराने परतावा देण्याच्या आमिषाने ८० लोकांकडून पैसे घेऊन त्यांची ६७ लाख ९० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
संदीप बाळासाहेब खेडकर (वय २५) आणि पोपट चंद्रकांत गेंड (वय २९) आणि अनुप बनकर (रा. सर्वजन-  रा. तळेगाव लुाळी वस्ती, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश जयराम गायकवाड (वय ३७, रा. बोराटेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे व्हिडीओ सेंटरमध्ये बालाजी इन्व्हेस्टमेन्ट नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना बारा टक्के दराने परतावा दिला जाईल असे सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये रोख आणि धनादेशाद्वारे पन्नास हजार रूपये दिले. त्या रकमेला हमी म्हणून खेडेकर याने शिक्रापूर येथील एक्सीस बँकेचा धनादेश दिला होता. पण आरोपींनी अद्यापही गुंतवणूक केलेली रक्कम आणि  त्याच्यावरील परतावाही दिला नाही. अशाच प्रकारे आरोपींनी ७५ ते ८० लोकांकडून पैसे घेऊन ते परत न करता ६७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली म्हणून फिर्याद दाखल आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डुबल अधिक तपास करत आहेत.