लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीने घेतला असला, तरी जिल्हा कार्यकारिणीचे अद्यापही काहीही ठरलेले नाही. शरद पवार की अजित पवार यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत तालुकाध्यक्षांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, आघाडी प्रमुखांबरोबर चर्चा करून आठवडाभरात निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या आणि राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कोणता निर्णय घ्यावा, या संदर्भात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवारी पुण्यात झाली. जिल्ह्यातील १३ तालुका अध्यक्षांपैकी काही तालुकाध्यक्ष या बैठकीला अनुपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली. मात्र, शरद पवार की अजित पवार यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, आमदार यांच्याबरोबर चर्चा करून आठवडाभरात निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रदीप गारटकर यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-पुणे शहर कार्यालयाचे दरवाजे अजित पवार गटासाठी बंदच! ‘हे’ आहे कारण
राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. चार ते पाच तालुकाध्यक्ष उपस्थित नाहीत. प्रत्येक तालुक्यातील राजकीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. शरद पवार हे श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित पवार अर्जुनाच्या रूपात आहेत. मात्र कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा अभिमन्यू झाला आहे. शरद पवार यांच्या गटात की अजित पवारांच्या गटात या प्रश्नाचे उत्तर तातडीने देणे योग्य नाही. जिल्ह्यातील पदाधिकारी मुंबई येथे होणाऱ्या अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्याचा एक निर्णय होऊ शकत नाही. प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय होऊ शकतात. जिल्ह्याचा एक निर्णय होईल की नाही, हे सांगता येणार नाही. प्रत्येक तालुक्यातून येणारे निर्णय तालुकाध्यक्षांकडून कळविले जाणार आहेत, असे प्रदीप गारटकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांचा ग्रामीण भागात प्रचंड दबदबा आहे. जिल्ह्यातील काही आमदारांनीही अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदारांचा पाठिंबा असल्याने तालुका संघटना पदाधिकाऱ्यांकडूनही अजित पवार यांना समर्थन दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबई येथील कोणाच्या बैठकीला कोण उपस्थित राहणार, यावरूनही कोणत्या तालुक्याचा कोणाला पाठिंबा ही बाबही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.