एका तपानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय सोमवारपासून (१ एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये स्थलांतरित होत आहे. पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित झाल्यावरच गुढी पाडवा (११ एप्रिल) या नववर्षांपासून महामंडळाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
साहित्य महामंडळाचे कार्यालय गेल्या तीन वर्षांपासून मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघाकडे होते. साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार आता आगामी तीन वर्षांसाठी हे कार्यालय पुण्याकडे आले आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षांतील साहित्य संमेलनांचे स्थळ त्याचप्रमाणे विश्व साहित्य संमेलनाच्या भवितव्याविषयीचे निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख पदाधिकारी हेच घेणार आहेत. प्रा. उषा तांबे यांच्यानंतर डॉ. माधवी वैद्य यांच्या निवडीमुळे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी महिलेला संधी मिळाली आहे. प्रमुख कार्यवाह प्रा. मििलद जोशी आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन हेच महामंडळाचे पदाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
कार्याध्यक्षा, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष हे ‘मसाप’चे प्रमुख पदाधिकारी बसतात ती सध्याची जागा महामंडळाच्या कार्यालयासाठी अपुरी आहे. त्यामुळे ८३ व्या साहित्य संमेलनाचे कार्यालय म्हणून ज्या जागेचा वापर केला जात होता तेथेच महामंडळाचे कार्यालय करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने बदल करून साधारणपणे गुढी पाडव्यापासून नव्या जागेमध्ये महामंडळाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे.