पुणे : शहरात कार्यालयीन जागा सहकार्याला गेल्या काही वर्षांपासून मोठी पसंती मिळत आहे. यामुळे कार्यालयीन जागा सहकार्याचे व्यवहार वाढू लागले आहेत. शहरात २०१८ पासून यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत कार्यालयीन जागा सहकार्याचे १२३ व्यवहार झाले आहेत. कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे हे देशात दुसऱ्या स्थानी आहे.
मालमत्ता सल्लागार क्षेत्रातील नाइट फ्रँक संस्थेने देशातील कार्यालयीन जागा सहकार्याचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुण्यासह दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकता या आठ महानगरांचा समावेश आहे. स्वतंत्रपणे कार्यालय सुरू करण्याऐवजी अनेक कंपन्या कार्यालयीन जागा सहकार्याचा पर्याय निवडत आहेत. यामुळे अनेक बड्या कंपन्या कार्यालयीन जागा सहकार्य सुरू करून अनेक कंपन्यांना सेवा देत आहेत. देशात कार्यालयीन जागा सहकार्याचे २०१८ ते यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत ९१२ व्यवहार झाले. त्यातील २५७ म्हणजेच २८ टक्के व्यवहार बंगळुरूत झाले. त्या खालोखाल १२३ व्यवहार पुण्यात झाले आहेत.
देशातील आठ महानगरांत २०१८ पासून यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत कार्यालयीन जागा सहकार्याचे मोठे व्यवहार (८० हजार चौरस फुटांवरील) १५३ झाले. त्यात सर्वाधिक ४७ व्यवहार बंगळुरूमध्ये झाले. त्या खालोखाल ३० व्यवहार पुण्यात झाले. कार्यालयीन जागा सहकार्याचे मध्यम व्यवहार (४० ते ८० हजार चौरस फूट) २०८ झाले. त्यात सर्वाधिक ६० बंगळुरूमध्ये आणि त्या खालोखाल ३३ पुण्यात झाले. कार्यालयीन जागा सहकार्याचे छोटे व्यवहार (४० हजार चौरस फुटांपर्यंत) ५५१ झाले. त्यात बंगळुरूत १५०, तर पुण्यात ६० व्यवहार झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यातील कार्यालयीन जागा सहकार्य
जागेचा आकार – व्यवहार
४० हजार चौरस फुटांपर्यंत – ६०
४० ते ८० हजार चौरस फूट – ३३
८० हजार चौरस फुटांवरील – ३०
एकूण – १२३