पिंपरी : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांचे अभ्यास दाैऱ्यांवर दाैरे सुरू आहेत. केरळ, अहमदाबाद दौऱ्यानंतर आता लडाख येथील दोन संस्थांमध्ये सहा दिवसांचा प्रशिक्षण दौरा काढण्यात येत आहे. त्यासाठी १६ लाखांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

काही महिन्यांपूर्वी आयुक्तांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुबई दाैरा केला हाेता. त्यानंतर करसंकलन विभागाचे अधिकारी अभ्यास दौऱ्यासाठी केरळला जाऊन आले. तसेच, नगररचना विभागाचे अधिकारी अहमदाबाद येथे प्रशिक्षण दौऱ्यावर गेले आहेत. या दाैऱ्यानंतर आता शिक्षण विभागाचा लडाख दौरा आहे. शिक्षण विभागाच्या या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्तांसह एकूण ३० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. प्रवास, निवास, भोजन खर्चासह प्रशिक्षणाकरिता प्रतिव्यक्ती जीएसटीसह ५१ हजार ९०६ रुपये खर्च येणार आहे. या संपूर्ण दौऱ्याकरिता १५ लाख ५७ हजार ६०० रुपये खर्च केला जाणार आहे.

एज्युकेशनल ॲण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख ही संस्था विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते. हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज् ही लोकांना त्यांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्ये शिकवून पर्यायी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. या दोन्ही प्रकल्पांची कौशल्ये पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील शिक्षकांनी आत्मसात करून त्याचे धडे शालेय विद्यार्थ्यांना द्यावेत, यासाठी दौऱ्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या शाळांतील २५ शिक्षक, याशिवाय सेवाभावी संस्थांचे तीन प्रतिनिधीदेखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. सहा दिवसांचा हा दौरा आहे.

तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट

महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून नगरसेवक नाहीत. विविध कारणांमुळे महापालिका निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीला गुरुवारीच तीन वर्षे पूर्ण झाली. नगरसेवक असताना आयुक्तांसह अधिका-यांवर त्यांचा वचक असताे. मात्र, प्रशासकीय राजवटीत अधिका-यांवर काेणाच वचक नाही. प्रशासकीय राजवटीत आत्तापर्यंत अधिका-यांचे पाच अभ्यास दाैरे झाले आहेत. या दाै-यांवर लाखाे रूपयांचा खर्च झाला आहे.