पिंपरी : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागी नेमणुकीस असलेल्या ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात येतील, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात बदल्या न झाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभय मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका सेवेतील ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. मात्र, लोकसभा निवडणुका असल्याने कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील जे अधिकारी, कर्मचारी हे एप्रिल व मे २०२४ या महिन्यात बदलीस पात्र ठरत होते. त्यांची आणि ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, वैद्यकीय कारणास्तव बदली पाहिजे अशा कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती.

त्यानुसार विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे आठ ऑगस्ट रोजी सादर केली. त्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक अधिकारी, कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे समोर आले.

हे ही वाचा…राज्यातील सर्वात मोठ्या ‘या’ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मिळेना

‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ३४ अधिकारी तर ‘क’ मधील ३३२ कर्मचारी आणि तांत्रिक संवर्गातील ७१ असे ४३७ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झाले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टअखेर बदल्या होतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बदल्या करण्यात येतील,असे आयुक्त शेखर सिंह यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते.

हे ही वाचा…BJP Candidate For Chinchwad Assembly Constituency : ‘चिंचवड’वरून भाजपमध्ये गटबाजी

आता निवडणुकीनंतरच बदल्या

विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत बदल्यांचा निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतरच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हाेण्याची शक्यता असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officers found refuge as 437 employees werent transferred before assembly election code pune print news ggy 03 sud 02