राज्यशासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले व महापालिकेतील दोन महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळत असलेले अशोक मुंढे व शहाजी पवार यांना शासनाच्या सेवेत परतण्याचे वेध लागले आहेत. निर्धारित मुदतीपेक्षाही एक वर्ष जास्त अशी चार वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्याने त्यांना पिंपरीत थांबायचे नाही. मात्र, बदलीचा निर्णय होत नसल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते.
सहायक आयुक्त शहाजी पवार यांच्याकडे करसंकलन विभागाच्या प्रमुखपदाची, तर मुंढे यांच्याकडे एलबीटी विभाग प्रमुखपदाची जबाबदारी आहे. चार वर्षांपूर्वी ते पिंपरी पालिकेत प्रतिनियुक्तीवर आले, तेव्हा सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे विभाग त्यांना देण्यात आले. जकात अधीक्षक म्हणून काम करताना मुंढे यांनी ५०० कोटींवर असलेले जकातीचे उत्पन्न १२०० कोटींवर नेऊन आपली कर्तबगारी सिध्द केली. तर, पवार यांनी करसंकलन विभागातून पालिकेला २६४ कोटींपर्यंतचे उत्पन्न मिळवून देत मिळकतींची संख्या साडेतीन लाखावर नेली. तीन वर्षांची मुदत संपली. मात्र, काम पाहून वर्षभर आणखी काम करण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांना करण्यात आली होती, त्यानुसार ते थांबले. आता चार वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना शासनाच्या सेवेत परतण्याचे वेध लागले आहेत. तथापि, पर्यायी व्यवस्था होत नसल्याने तूर्त त्यांच्या बदलीचा निर्णय होत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. राज्यशासनाच्या प्रशासकीय सेवेत नव्या बदल्या होण्याचा काळ सुरू असून कोणत्याही परिस्थितीत पिंपरी पालिकेत राहायचे नाही, यावर हे दोन्ही अधिकारी ठाम आहेत. तथापि, याविषयी त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.