गणेश यादव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, दोन अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी गुरुवारी महापालिका वाऱ्यावर सोडून क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गहुंजेला गेले होते. आयुक्तच दुपारपासून गायब झाल्याने महापालिकेत शुकशुकाट होता.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना गुरुवारी झाला. विश्वचषकातील पुण्यातील पहिलाच सामना असल्यामुळे तिकीट खरेदीसाठी चाहत्यांची मोठी झुंबड उडाली होती. त्यातच तिकिटाचा काळा बाजार झाल्याबाबत काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सामन्याची अति महत्त्वाची (व्हीआयपी) तिकीट मिळाली होती. तर, काही अधिकाऱ्यांना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिकिटे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-स्मार्टसिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी अखेर अटकेत

महापालिकेत दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय राजवटीत महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप होतो. आयुक्तांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. प्रशासकीय कामकाजाच्या दिवशी स्वतः आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, उपायुक्त रविकिरण घोडके यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी महापालिका वाऱ्यावर सोडून क्रिकेटचा सामना पाहण्यास गेले होते. आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी सामना पाहण्यास गेल्याने कर्मचारी निवांत होते. दुपारपासून महापालिकेत शुकशुकाट होता.

दरम्यान, एका उपायुक्ताने आपण रितसर अर्धी रजा टाकून सामना बघायला गेल्याचे सांगितले. मात्र, सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वरित अधिकारी यांचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजेचा अर्ज आला नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officials leave work to watch cricket match in pimpri municipal corporation pune print news ggy 03 mrj