पुणे : तेल कंपन्यांचे हजारो डॉलर वाचवणारे संशोधन एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या चमूने केले आहे. त्यांनी तयार केलेल्या स्मार्ट इन लाइन इन्स्पेक्शन (सिली) या उपकरणाला एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त झाले आहेत. पाइपमधून तेल वाहून त्यात मेणासारखा थर तयार होतो. हा थर काढण्यासाठी यंत्रांचा वापर करावा लागतो. हा थर पाइपमध्ये नक्की कोठे जमा झाला आहे हे समजत नसल्यामुळे संपूर्ण पाइपलाइन साफ करावी लागते. एका विशिष्ट लांबीची पाइपलाइन स्वच्छ करण्यासाठी जवळपास ५० हजार डॉलर इतका खर्च येतो. या प्रक्रियेवेळी पाइपलाइन काही कालावधीसाठी बंद ठेवावी लागते. त्यामुळे तेल कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्येची माहिती विद्यार्थ्यांना २०१९ मध्ये एका हॅकेथॉनमध्ये सहभागी झाल्यावर मिळाली. त्या स्पर्धेत त्यांनी या उपकरणावर काम सुरू केले.
सिली हे उपकरण पाइपमध्ये साचलेल्या मेणाच्या जाडीबद्दल तत्काळ (रिअल-टाइम) माहिती प्रदान करते. आयओटीवर आधारित या उपकरणासाठी विविध सेन्सर्सचा उपयोग करण्यात आला आहे. विघ्नेश शेणॉय, संकेत शिंदे, स्नेहल कोळेकर या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज पाटील, स्लाविन मस्करेन्हास, विराज जिवाणे, अश्वजीत पवार, दीपककुमार यादव, रिया हुद्दार या विद्यार्थ्यांनी या उपकरणाची निर्मिती केल्याची माहिती विद्यापीठाने दिली.
हेही वाचा : पुण्यात सामोशामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे; एकाला अटक
उपकरणाने तत्काळ दिलेल्या माहितीमुळे मेणासारखा थर जमा होण्याचा कल समजतो. किती दिवसांनंतर किती थर वाढेल हे गणित करून खरोखरच पाइप स्वच्छ करण्याची गरज आहे का, याची माहिती मिळते. खूप मोठ्या प्रमाणात जमा झाल्यावरच स्वच्छ केल्यास इतर वेळी स्वच्छतेचा खर्च वाचतो, असे पृथ्वीराज पाटीलने सांगितले. एका तेल कंपनीने समस्या विधान दिले होते. त्यानंतर आम्ही आमच्या परीने अभ्यास केला. सेन्सर, वेब उपयोजन, सैद्धान्तिक मांडणी केली. मात्र त्याचा व्यावहारिक वापर योग्य पद्धतीने होणे फार महत्त्वाचे होते, असे रिया हुद्दार या विद्यार्थिनीने सांगितले.