पुणे : राज्यासह देशभरात आंबे बहारातील डाळिंबाची काढणी जूनपासून सुरू झाली आहे. निर्यातीसाठी आणि स्थानिक बाजारात चांगला मिळत आहे. पण, राज्यातील डाळिंब पट्ट्यात सतत पाऊस होत असल्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. निर्यातक्षम फळे मातीमोल होऊ लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात प्रामुख्याने आटपाडी, कवठे महांकाळ, जत, सांगोला, सोलापूर, इंदापूर, फलटण, नगर आणि नाशिक परिसरातील कमी पावसाच्या पट्ट्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. सध्या आंबे बहरातील फळांची काढणी सुरू झाली आहे. पण, काढणी सुरू झाल्यापासून डाळिंब पट्ट्यात सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या, निर्यातक्षम फळांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कीडनाशकांच्या फवारण्या करून ही रोग आटोक्यात येत नाही. दर्जेदार फळे मातीमोल होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा >>> मनोरमा खेडकर यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

देशभरात सुमारे ४० हजार हेक्टरवर आंबे बहारात डाळिंबांचे पीक घेतले जात आहे. त्यापैकी राज्यातील क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. निर्यातीसाठी १२० ते १५० किलो आणि स्थानिक बाजारात ८० ते ९० रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. हेक्टरी सरासरी १५ टन डाळिंबाचे उत्पादन निघत आहे. एकूण उत्पादित डाळिंबापैकी १० टक्के डाळिबांची निर्यात होत आहे. देशातून प्रामुख्याने बांगलादेश, आखाती देशांना निर्यात होते. एकूण निर्यातीपैकी तब्बल ८० टक्के निर्यात एकट्या बांगलादेशाला होत आहे. मागील दीड महिन्यात बांगलादेशाला सुमारे पाच हजार टन डाळिंबांची निर्यात झाली आहे.

हेही वाचा >>> घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली ‘ही’ घोषणा

बांगलादेशाचा आयात कर प्रति किलो १०१ रुपयांवर

बांगलादेश भारतीय डाळिंबाचा मोठा आयातदार आहे. पण, बांगलादेशाने डाळिंबावर प्रति किलो १०१ रुपये आयात कर लागू केला आहे. त्यामुळे डाळिंबाच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. खरेदी दर आणि कर जळपास तितकाच असल्यामुळे व्यापारी निर्यातीसाठी धजावत नाहीत. आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहारातील फळांचा दर्जा चांगला असतो. उन्हाळ्यात पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करून शेतकरी डाळिंब पिकवतात. आता ऐन काढणीच्या वेळेला बांगलादेशाने आयात कर वाढविल्यामुळे दरात घसरण होत आहे, अशी माहिती सांगोला येथील शेतकरी दत्तात्रय येलपले यांनी दिली.

आंबे बहारातील डाळिंबाची काढणी सुरू आहे. फळांचा दर्जा चांगला आहे. दरही चांगला मिळत आहे. पण, सततच्या पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बांगलादेशाने आयात करात वाढ केल्यामुळे निर्यातीवर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशाने लागू केलेला आयात कर कमी करण्याची गरज आहे. बांगलादेशाच्या आयात कराचा सर्वच फळपिकांना फटका बसत आहे. – प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघटना.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oily spot disease on pomegranate due to continuous rain pune print news dbj 20 zws
Show comments