पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा कारभार आकुर्डीत ७० कोटीहून अधिक रक्कम खर्चून उभारलेल्या नव्या प्रशस्त इमारतीत सुरू झाला आहे. तथापि, गेल्या सात महिन्यांपासून प्राधिकरणाचे निगडीतील जुने कार्यालय धूळ खात पडून आहे. आजमितीला ३० कोटीहून अधिक किंमत असलेली व मुंबई-पुणे महामार्गालगत असलेली मोक्याची इमारत वापराविना का पडून आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ८ फेब्रुवारीला प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतरचे काही दिवस जुन्या कार्यालयातील साहित्य नव्या ठिकाणी हलवण्यात येत होते. जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्याचा काही भाग तहसील कार्यालयासाठी तसेच उपनिबंधक कार्यालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. तथापि, त्यामुळे ही इमारत अडकून पडेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या या इमारतीचे आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन शासकीय कार्यालयांना जागा देण्यास अप्रत्यक्ष नकारघंटा दर्शवण्यात आली व तो प्रस्ताव बारगळला. त्यानंतर, तहसील कार्यालय प्राधिकरणाच्या नव्या इमारतीत आणण्यात आले. या दरम्यानच्या कालावधीत प्राधिकरणाची जुनी इमारत धूळ खात पडून आहे. त्याचे नेमके काय करायचे, याचे धोरण प्राधिकरण प्रशासनाला ठरवायचे आहे. त्या ठिकाणी व्यापारी संकुल, मल्टीप्लेक्स असे काही सुरू करता येईल का, याचा विचार सुरू आहे. प्रत्यक्षात कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. १९८२ साली ही इमारत उभारण्यात आली. तत्कालीन नगरविकासमंत्री रामराव आदिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. प्राधिकरणाचा आतापर्यंतचा विकास याच इमारतीच्या माध्यमातून झाला, याकडे लक्ष वेधण्यात येते.