पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबॉम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. बॉम्ब जागेवरच निकामी करण्यात आले आहेत.
हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बाणेर परिसरात खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) सापडले. मेट्रो कामगारांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमिपुत्रांचा लढा; महायुतीच्या आमदारांचा पाठिंबा
पोलिसांनी त्वरित बॉम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. बॉम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने बॉम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. बॉम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. हात बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवून निकामी करण्यात येणार आहे. हात बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.