बारामती : सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्ध महिलेचा बारामतीतून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही महिला दोनच दिवसांपूर्वी तिच्या मुलीकडे राहण्यासाठी आली होती.
सरस्वती गुणवंत तोंडारे (वय ६७, रा. भिगवण) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तोंडारे यांचे पती निवृत्ती पोलीस कर्मचारी आहेत. त्या दोन दिवसांपूर्वी बारामती येथील टी. सी. महाविद्यालयाजवळील ओझर्डे इस्टेट येथे त्यांच्या मुलीकडे आल्या होत्या. सकाळी सातच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या. सकाळची फेरी मारण्याच्या उद्देशाने त्या बाहेर पडल्या. या दरम्यान पाय घसरून त्या कालव्यात पडल्या. कालव्याच्या पुलाजवळ सकाळी काही नागरिकांना एक महिला पडली असल्याचे दिसले. त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. नागरिकांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.