पुणे : महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या पदावर राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून इचलकरंजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, तसेच मुख्याधिकारी श्रेणीतील ओमप्रकाश दिवटे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त म्हणून जाण्याचा महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मार्ग बंद झाला आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दिवटे यांची नियुक्ती केल्याचा आदेश सोमवारी नगरविकास विभागाने काढला. दिवटे तीन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. या नियुक्तीमुळे महसूल विभागाकडून अपर आयुक्त म्हणून बढती मिळालेले महेश पाटील यांचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नगरविकास विभागाने काढलेले आदेश ग्राह्य धरावेत, इतर विभागांनी काढलेल्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेऊ नये, असा स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्याने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाटील यांना अतिरिक्त आयुक्त या पदावर रुजू करून घेतले नव्हते.