हेल्मेट सक्ती फायद्याची की, तोटयाची यावरुन पुण्यात वादविवाद सुरु असताना नववर्षाच्या पहिल्याचदिवशी पुणे-बंगळुरु महामार्गावर एका २२ वर्षीय युवकाचा बाईक अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. अमेय शिंदे असे मृत युवकाचे नाव आहे. नववर्ष सुरु झाल्यानंतर काही तासांच्या आत बाईक अपघातात अमेयला आपले प्राण गमवावे लागले. सनबर्न फेस्टीव्हलमधले काम संपवून घरी परतत असताना अमेयची बाईक उड्डाणपूलाच्या रेलिंगला धडकली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमेयचा काही वेळातच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी अमेय सोबत त्याचा मित्र ऋषिकेश पवारही (२२) होता. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे. बाईकवर मागे बसलेला ऋषिकेश सुदैवाने या अपघातातून बचावला. भोसरी इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या दोन्ही युवकांनी अपघाताच्यावेळी हेल्मेट घातले नव्हते.
कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असणारा अमेय सनबर्न फेस्टीव्हलसाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत काम करत होता. २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असे तीन दिवस पुण्यात या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. अमेय सोबत त्याचा बालपणीचा मित्र ऋषिकेशही फेस्टीव्हलसाठी काम करत होता. काम संपवून अमेय आणि ऋषिकेश दोघे घराच्या दिशेने निघाले.
पुणे-बंगळुरु महामार्गावर ऑरचिड हॉटेलजवळच्या उड्डाणपूलावर अमेयची बाईक पूलाच्या रेलिंगला धडकली. ऋषिकेशला या अपघाताचा जबर धक्का बसला असून जे घडले त्यावर अजूनही आपला विश्वास बसत नाहीय असे त्याने सांगितले. अमेय आणि ऋषिकेशोसोबत त्यांचे आणखी दोन मित्रही दुसऱ्या बाईकवरुन त्याच रस्त्यावरुन चालले होते. अपघातानंतर तिघांनी एक रिक्षा थांबवली व त्यातून ते अमेयला नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. सहा वाजता त्यांनी अमेयला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ४० मिनिटात अमेयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुण्यात हेल्मेट सक्तीवरुन वादविवाद सुरु आहे. अनेक पुणेकरांना हेल्मेट सक्ती मान्य नसून याविरोधात आज गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला.