आज साजऱ्या होणाऱ्या पंचविसाव्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे विद्यापीठातील आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) या संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत संस्था जनतेस खुली आहे. रात्री आठपर्यंतच भाषणांचे आयोजन करण्यात आले असून वैज्ञानिकांना प्रश्न विचारा या कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉ. अजित केंभावी व खगोलवैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर मार्गदर्शन करणार आहेत. शालेय मुलांसाठी व पालकांसाठी संस्था या दिवशी (२८ फेब्रुवारी) खुली राहणार असून न्यूटनचे सफरचंदाचे झाड, स्काय डोम, फोकाल्टचा दोलक, सम्राट यंत्र या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मंगळ संशोधनाविषयी तसेच विज्ञानातील सर्वोत्तमता या विषयांवर प्रदर्शनेही आयोजित केली आहेत. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आयुकात होणार आहे. प्रा. उमाकांत रापोळ यांचे भौतिकशास्त्रातील २०१२ चे नोबेल पुरस्कार या विषयावर सायंकाळी सहा वाजता भाषण होणार आहे, तर संस्थेचे संचालक अजित केंभावी यांचे प्रकाशीय दुर्बिणी या विषयावर भाषण होणार आहे. रात्री साडेसात ते साडेदहा पर्यंत आकाशदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे, असे विज्ञान कार्यक्रम अधिकारी प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितले. सकाळी सव्वादहाला शिवाशिष लाहा यांचे कृष्णविवरांचे गूढ या विषयावर भाषण होणार आहे. सकाळी अकरा वाजता विक्रम खैरे विश्वाचा इतिहास उलगडून सांगणार आहेत, दुपारी पावणेबारा वाजता ल्युक क्लॅमेंडी यांचे सौरमालेबाहेरील ग्रह या विषयावर भाषण होईल. साडेबारा वाजता श्रीविद्या सुब्रम्हण्यम या पृथ्वी व सूर्य यांचा संबंध उलगडणार आहेत. दुपारी दीड वाजता शुभांशू बारवे हे आभासी वेधशाळेची संकल्पना स्पष्ट करणार आहेत.
डॉ. अजित केंभावी यांनी सांगितले की, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रामन परिणाम’ हा प्रकाशाच्या गुणधर्माबाबतचा शोध जाहीर केला होता त्यामुळे हा दिवस आपल्या देशात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. रामन यांना १९३० मध्ये या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. १९८७ पासून २८ फे ब्रुवारी हा भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा