‘रूपवेध प्रतिष्ठान’ तर्फे तन्वीर स्मृतिदिनानिमित्त ९ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे
प्रतिष्ठानचे अध्यक्ष-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम या दाम्पत्याचा मुलगा तन्वीर याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ रंगकर्मीस एक लाख रुपयांचा ‘तन्वीर सन्मान’ प्रदान केला जातो. गेली दहा वर्षे हा सन्मान प्रदान केला जात आहे. याच्याजोडीला युवा रंगकर्मीस ३० हजार रुपयांचा ‘नाटय़धर्मी’ पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी तन्वीर स्मृतिदिन होत असला तरी तन्वीर सन्मानाऐवजी नव्या नाटकाचा प्रयोग होणार असल्याची माहिती डॉ. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘बिनकामाचे संवाद’ नाटकाचे लेखक धर्मकीर्ती सुमंत आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे या वेळी उपस्थित होते.
दीपा श्रीराम म्हणाल्या,‘‘तन्वीर सन्मान कार्यक्रमात तोचतोपणा असू नये हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्याचे ठरवित आहोत. त्यासंदर्भातील पर्याय शोधत आहोत. हा पर्याय अद्याप गवसला नसल्याने यंदाच्या वर्षी आम्ही पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ हा पुरस्कार रद्द झालेला नाही, तर विशिष्ट साचा होऊ नये म्हणून यंदा हा प्रयोग केला आहे. ‘तन्वीर’ पुरस्कार आणि ‘नाटय़धर्मी’ पुरस्कार अशा दोन्ही पुरस्कारांची रक्कम ‘नाटक कंपनी’ या नाटय़संस्थेला देण्यात येणार आहे. धर्मकीर्ती सुमंत आणि आलोक राजवाडे हे नाटकाकडे गंभीरपणाने पाहात असून नाटकातून विषय आणि आशय पोटतिडिकीने मांडत आहेत. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगत आहेत. म्हणूनच ‘नाटक कंपनी’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
तन्वीर स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात नाटकाचा प्रयोग करावयास मिळणे हे आमच्यासाठी आनंददायी असल्याची भावना धर्मकीर्ती सुमंत आणि आलोक राजवाडे यांनी व्यक्त केली. या संस्थेने ‘सुट्टी बुट्टी’, ‘गेली एकवीस वर्षे’, ‘अपराधी सुगंध’, ‘नाटक नको’, ‘शिवचरित्र आणि एक’, ‘मीगालिब’, ‘चक्र’, ‘झाडं लावणारा माणूस’, ‘दोन शूर’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ पावटॉलॉजी’, ‘एक दिवस मठाकडे’ ही नाटके सादर केली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा