यंदाच्या वर्षातील शेवटच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युतरोषणाईमुळे गणपती बाप्पा पुष्पमहालात विराजमान झाल्याचा भास होत होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा कुबेर यांनी गानसेवा दिली. त्यानंतर गणेशयाग आयोजित करण्यात आला होता.
त्याचबरोबर मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीमध्ये ३ हजार किलो झेंडू, २ हजार किलो शेवंती, २२ हजार कामिनी गड्डया, गुलाब यांसह विविध प्रकारच्या इतर ६ हजार किलो फुलांचा समावेश होता. सुभाष सरपाले आणि २५० महिला व पुरुषांनी सलग तीन दिवस काम करुन ही सजावट केली आहे.
मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या अलिकडेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.