पुणे : दिवाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी घातली आहे. मध्य भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आल्या असून, पाच नोव्हेंबरपर्यंत मध्य भागात वाहतूक बदल लागू राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. अनेक जण मोटार घेऊन मध्य भागात येतात. अरुंद रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील मुश्कील होते. या पार्श्वभूमीवर, मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत सोमवारपासून (२१ ऑक्टोबर) बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

हेही वाचा >>>खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त

मध्य भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे…

– छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.

– स्वारगेटकडून बाजीराव रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चारचाकी वाहनांनी टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

– अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.

– फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.

– शनिपार चौकातून, तसेच कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहने लावण्यासाठी जागा

‘लक्ष्मी रस्त्यासह मध्य भागात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांनी मंडईतील वाहनतळ, नारायण पेठेतील हमालवाडा, नारायण पेठेतील साने वाहनतळावर वाहन लावावे,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of pune diwali the traffic police banned four wheelers in the central area pune print news rbk 25 amy