लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
श्री शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत स्वराज्य रथ सहभागी होणार आहेत. मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सोमवारी सकाळी सातनंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
आणखी वाचा-नाना पटोले यांची भाजपवर कडाडून टीका, म्हणाले, ‘न्यायालयाकडून भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर…’
जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जावे. गणेश रस्त्यावरुन जिजामाता चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी दारुवाला पूल चौकातून वळून इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चैाकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने मिरवणूक काढण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह चौक, खंडोजीबाब चौक, डेक्कन जिमखानामार्गे इच्छितस्थळी जावे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर मध्यभागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठ, शनिवार पेठमार्गे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन इच्छितस्थळी जावे, अशी सूचना देण्यात आली आहे.