पुणे : भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ (स्टे सेफ ऑनलाइन) मोहीम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले.
युजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. विद्यार्थी आणि तरुणांसह विविध वयोगटांमध्ये समाजमाध्यमे, डिजिटल आर्थिक व्यवहार आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्याचा उद्देश आहे.
हेही वाचा – पुणे : वीरयोद्ध्याकडून नागरिकांनी अनुभवला कारगिल युद्धाचा थरार
हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांतून सायबर गुन्हे आणि ऑनलाइन धोक्यांबाबत जागृती करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत जगनागृती करावी. त्यासाठी चर्चासत्र, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गटचर्चा आदी उपक्रम आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.